नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना सर्व कर्मचाऱ्यांपर्यत पोहोचविण्याचे आदेश बीएसएनएलने सर्कल प्रमुखांना दिले आहेत.
स्वेच्छा निवृत्ती योजना-२०१९ ही केंद्रीय मंत्रिमंळाचा निर्णय आणि दूरसंचार विभागाने कळविल्याप्रमाणे लागू करण्यात आल्याचे बीएसएनएलने सर्कल प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ही योजना ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा-बीएसएनएलमध्ये एमटीएनएल विलीन होण्याचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारची मंजुरी
पात्र उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीची माहिती जास्तीत जास्त पोहोचवावी, असे बीएसएनएलने पत्रात म्हटले आहे. स्वेच्छा निवृत्तीबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
हेही वाचा-बीएसएनएलची खर्चाला कात्री; अधिकाऱ्यांना इकॉनॉमी वर्गातून विमान प्रवास करण्याचे आदेश
स्वेच्छा निवृत्ती योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीवरच बीएसएनएलचे पॅकेज अवलंबून असेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी वरिष्ठांवरील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
कंपनीमध्ये १.७५ लाख मनुष्यबळ कार्यरत आहे. कंपनीच्या एकूण महसुलातील ७५ टक्के खर्च हा मनुष्यबळावर खर्च होतो. गेली दहा वर्षे बीएसएनएल ही तोट्यात आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बीएसएनएलला १४ हजार ३०० कोटींचा तोटा झाला आहे.
अशी आहे स्वेच्छा निवृत्ती योजना-
- ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५३.५ वर्षांहून अधिक वय आहे, त्यांना वेतनाच्या १२५ पट पैसे दिले जाणार आहेत. हे वेतन त्यांना उर्वरित सेवेत मिळविता आले असते.
- ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५० ते ५३.५ वर्षे आहे, त्यांना वेतनाच्या ८० ते १०० टक्के पैसे दिले जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५५ वर्षांहून अधिक आहे, त्यांना ६० वर्षानंतर पेन्शन लागू होणार आहे.
- ज्यांचे वय ५५ वर्षे अथवा त्याहून कमी आहे, त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार २०२४-२५ पर्यंत पेन्शन देण्यात येणार आहे.
बीएसएनएलने स्वेच्छा निवृत्तीबाबत कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा, अशी केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सूचना केली होती. त्यातून चांगला प्रतिसाद मिळेल, असेही प्रसाद म्हणाले होते.