सॅन फ्रान्सिस्को -अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार एलिझाबेथ वॉरेन यांनी आयओएस अॅप स्टोअरवरून अॅपलने त्यांची अॅप विकू नये, असे म्हटले आहे. त्या साऊथवेस्ट टेक्नॉलॉजीच्या टेक्सासमधील परिषदेत बोलत होत्या. विशेष म्हणजे एलिझाबेथ या अमेरिकेच्या २०२० मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत.
अॅपल, गुगल, फेसबुक अशा कंपन्यांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव वाढल्याची खंत एलिझाबेथ वॉरेन यांनी व्यक्त केली. ज्या ई-कॉमर्स कंपन्यांची उलाढाल २५०० कोटी डॉलरहून अधिक आहे, अशा कंपन्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी मनाई करावी, असा कायदा अमेरिकेच्या संसदेसाठी प्रस्तावित आहे. हा कायदा मंजूर करण्यास एलिझाबेथ यांनी समर्थन दिले आहे. अॅपलचे अॅप स्टोअर आणि अॅपची विक्री हे दोन्ही व्यवसाय एकाचवेळी अॅपलचे नसले पाहिजेत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. हाच नियम अॅमेझॉन, गुगल आणि फेसबुकसाठी लागू करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
या प्रस्तावानुसार अॅमेझॉन त्यांची स्वत:ची उत्पादने अॅमेझॉन रिटेल स्टोअरवरून विकू शकणार नाहीत. गुगल सर्च केल्यांतर त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकणार नाही. फेसबुकदेखील हे इनस्ट्राग्राम आणि व्हॉट्सअॅपपासून विलग करावे लागणार आहे. सध्या तिन्ही उत्पादने जोडण्यासाठी फेसबुक प्रयत्न करत आहे.