बीजिंग - अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा फटका बसून जीडीपीत १ टक्क्यांची घट होईल, अशी कबुली चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पहिल्यांदाच चीनकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गतवर्षी चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण होऊन जीडीपी ६.८ टक्क्यापर्यंत पोहोचला होता. ही घसरण कायम राहत यंदा हा जीडीपी हा ६ ते ६.५ टक्क्यापर्यंत पोहोचेल, असा अंदाज चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीसी) स्थायी समितीचे सदस्य वँग यांग यांनी व्यक्त केला. याबाबतचे वृत्त हाँगकाँगच्या माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. ते मेनलँड चीनमध्ये कंपन्या असलेल्या तैवानी उद्योजकांच्या गटांशी बोलत होते.
व्यापारी युद्धातून तोडगा निघाला नाही तर करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती दिली नाही. सरकारमधील ते पहिले अधिकारी आहेत, ज्यांनी व्यापारी युद्धाबाबत प्रामाणिकपणे मत मांडले आहे. चीनची अर्थव्यवस्था चांगली नसल्याने आयात शुल्काच्या युद्धाचा बीजिंगवर खूप वाईट परिणाम होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चीनच्या अर्थव्यवस्थेवर जरी व्यापारी युद्धाचा परिणाम होणार असला तरी रचनात्मक कोणताही बदल होणार नाही, असेही ते म्हणाले. व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि अमेरिकेदरम्यान ११ चर्चेच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र या फेऱ्या अपयशी ठरल्या आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, व्यापाराला संरक्षण देणाऱ्या अमेरिकेमुळे अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. मात्र आम्ही त्यावर पूर्ण मात करू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.