महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दुचाकीसह चारचाकीवरील विमाही १६ जूनपासून महागणार, असे असतील नवे दर

दुचाकीसह चारचाकीसाठी तृतीय पक्षाचा विमा बंधनकारक असतो. हे विम्याचे दर वाढल्याने वाहनविक्रीवर विपरित परिणाम होईल, अशी भीती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (एफडीए) व्यक्त केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची समस्या भेडसावत आहे.

प्रतिकात्मक - वाहन विमा

By

Published : Jun 7, 2019, 1:24 PM IST

नवी दिल्ली - आरबीआयने गुरुवारी रेपो दरात कपात करून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र विम्याच्या हप्त्यात मोठी वाढ होत असल्याने दुचाकी आणि चारचाकीसाठी कर्ज घेणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. विमा क्षेत्र नियामक आयआरडीएआयने दुचाकीसह चारचाकीवरील तृतीय पक्षाच्या विम्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विम्यांचा हप्ता २१ टक्क्यापर्यंत वाढणार असल्याने ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.

आयआरडीएने १ एप्रिलापासून विम्याचे दर वाढविले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी १६ जूनपासून होणार आहे.

असे असतील चारचाकीच्या विम्याचे दर -
१००० सीसीहून कमी इंजिन क्षमतेच्या कारसाठी २ हजार ७२ रुपये विम्याचा हप्ता द्यावा लागणार आहे. याच विम्यासाठी सध्या ग्राहकांना १ हजार ८५० रुपये मोजावे लागतात. १ हजार सीसी ते १ हजार ५०० सीसी क्षमतेचे इंजिन असलेल्या कारच्या विम्यातही वाढ होणार आहे. हे दर १२. ५ टक्क्यांनी म्हणजे ३ हजार २२१ रुपयांनी वाढणार आहेत.


असे असतील दुचाकीच्या विम्याचे दर
इंजिनक्षमता १५० ते ३५० सीसी क्षमता असलेल्या दुचाकींच्या विम्यात दरवाढ होणार आहे. नव्या विम्याचा हप्ता हा २१.११ टक्क्याने वाढून १ हजार ९९३ रुपये होणार आहे. यापूर्वी दुचाकीसाठी ग्राहकांना ९८५ रुपये विम्याचा हप्ता द्यावा लागत होता.

खासगी आणि प्रवासी वाहनांवरील तृतीय पक्षाच्या विम्यातही दरवाढ करण्याचा आयआरडीएआयने निर्णय घेतला आहे. याचबरोबर स्कूल बससाठीच्या विम्याचेही दर वाढविण्यात आले आहेत.

यांना दरवाढीतून वगळण्यात आले-

३५० सीसी क्षमतेच्या सुपरबाईकवरील विम्याच्या हप्त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सीसी इंजिन १ हजार ५०० एवढी क्षमता असलेल्या चारचाकीवरील विम्याचे दर पूर्वीप्रमाणे ७ हजार ८९० रुपये राहणार आहेत. ई-रिक्षांना विमा दरवाढीतून वगळण्यात आले आहे. दीर्घकाळासाठी एकदाच पैसे भरून घेण्यात येणाऱ्या विम्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

चारचाकीसाठी ३ वर्षांचा भरण्यात येणारा विमा हप्ता दीर्घकाळासाठी तर दुचाकींसाठी पाच वर्षांचा असतो.

दुचाकीसह चारचाकीसाठी तृतीय पक्षाचा विमा बंधनकारक असतो. हे विम्याचे दर वाढल्याने वाहनविक्रीवर विपरित परिणाम होईल, अशी भीती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (एफडीए) व्यक्त केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची समस्या भेडसावत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details