मुंबई - बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ३०० अंशांनी वर गेला होता. आशियायी गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे, तसेच एचडीएफसीने इंडेक्स-हेविवेट्समध्ये खरेदी केल्यामुळे शेअर बाजारावर हा परिणाम दिसून आला. यानंतर सेन्सेक्स ३२,४००.३५ अंशांवर स्थिरावला होता. यासोबतच, निफ्टीही तेजीमध्ये उघडून ९,४५९.८५ वर स्थिरावला होता.
कोण वधारले, कोण घसरले..
एचडीएफसी कंपनीचे शेअर्स सर्वाधिक (पाच टक्के) वधारलेले दिसून आले. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, एम अँड एम, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांचे शेअर्स वधारले होते. तर दुसरीकडे, इंडस बँक, अॅक्सिस बँक, टायटन, एचयूएल, एशियन पेंट्स आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
सरकारकडून आणखी एका मदतीच्या पॅकेजची घोषणा होईल, या आशेने बाजारपेठेतील स्टॉक्स घेतले जात असल्याचे ट्रेडर्सनी सांगितले. तसेच, जागतिक स्तरावर हळूहळू लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापाराला चालना मिळण्याचीही आशा गुंतवणुकदार करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. यासोबतच, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाचा निर्णयही बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम करेल अशी आशा गुंतवणुकदारांना आहे.