नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाचे व्याजदर स्वस्त केले. त्यापाठोपाठ बचत खात्यासह ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने खात्यावर १ लाख रुपयापर्यंत बचत असलेल्या रकमेवरील व्याजदरात २५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. तर किरकोळ ठेवीवरील व्याजदर १० बेसिस पाँईटने तर दीर्घकाळ कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर ३० बेसिस पाँईटने कमी केला आहे.
व्यवस्थेत चलन मुबलकता आहे. हे लक्षात घेवून व्याजदरात कपात केल्याचे एसबीआयने म्हटले आहे. या निर्णयाने बचत खात्यावरील व्याजदर हा ३.५० टक्क्यांवरून ३.२५ टक्के होणार आहे. हे कर्जाचे व्याजदर १ नोव्हेंबर २०१९ पासून लागू होणार आहेत.
बँकेने किरकोळ मुदत ठेवीवरील (एका वर्षाची मुदत) व्याजदर १० बेसिस पाँईटने कमी केला आहे. तर दीर्घकाळाच्या मुदत ठेवीवरील ( २ वर्षांहून अधिक कालावधी) ३० बेसिस पाँईटने व्याजदरात कपात केली आहे. हे कमी झालेले व्याजदर १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.