मुंबई- पंजान नॅशनल बँकेला (पीएनबी) भारतीय रिझर्व्ह बँकेने १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टिम कायद्याचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून भुतानमधील ड्रक पीएनबी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा २०१० पासून वापर करण्यात येत होता. त्यासाठी पीएनबीने आरबीआयची कोणताही परवानगी घेतली नव्हती. पेमेंट आणि सेटलमेंट कायदा २००७ चे (पीएसएस अॅक्ट) उल्लंघन होत असल्याने आरबीआयने पीएनबीला दंड ठोठावला आहे. ही माहिती पीएनबीने शेअर बाजाराला शनिवारी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरची किंमत १.३७ टक्क्यांनी वधारून शुक्रवारी शेअर बाजारात दिवसाखेर २९.५० रुपये होती.
पाच पेमेंट सिस्टम ऑपरेटरचे परवाने रद्द-
पेमेंट सिस्टम ऑपरेटर करणाऱ्या पाच कंपन्यांचे सर्टिफिकेट ऑफ ऑथरायझेशन (सीओए) रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यामध्ये सर्टिफिकेट ऑफ प्रो सोल्यूशन्स प्रायव्हेट, इनकॅशमी मोबाईल वॉलेट सर्व्हिस यांचा समावेश आहे. तर दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मोडल ट्रान्सिट सिस्टिम आणि पायरो नेटवर्कने स्वत:हून परवाना रद्द करण्याची आरबीआयला विनंती केली होती. तर एअरसेल स्मार्ट मनी ऑपरेटरने परवान्याचे नुतनीकरण न केल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या चारही ऑपरेटरला प्रिपेड इंस्ट्रुमेंटचा परवाना देण्यात आला होता. पाचही ऑपरेटरचे परवाने रद्द झाल्याने त्यांना यंत्रणेतून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीने १४ हजार कोटींची फसवणूक केल्यानंतर पंजाब नॅशनल बँक आर्थिक डबघाईमधून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतरही फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीला आले होते.