भोपाळ - भारतीय रेल्वे ही सरकारची पूर्णपणे नफ्यात चालणारी सेवा नाही. मात्र, रेल्वेने भंगार विक्रीतून गेल्या दहा वर्षात ३५ हजार ७३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ही रक्कम ईशान्येकडील तीन राज्यांच्या एकत्रित अर्थसंकल्पाहून अधिक आहे.
सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ पत्रकार जितेंद्र सुराणा यांनी रेल्वेने केलेल्या भंगारविक्रीची आरटीआयमधून (माहिती अधिकार) माहिती मागविली होती. या अर्जाला मिळालेल्या उत्तरामधून रेल्वेने भंगार विक्रीतून प्रचंड उत्पन्न मिळविल्याची माहिती समोर आली आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी सिक्कीमचा अर्थसंकल्प ७ हजार कोटींचा, मिझोरामचा अर्थसंकल्प ९ हजार कोटींचा तर मणिपूरचा अर्थसंकल्प १३ हजार कोटींचा होता. गेल्या दहा वर्षात रेल्वेने भंगारातील बोगी, डबे आणि रेल्वे रुळाची विक्री केली आहे. यातून रेल्वेने एकूण ३५ हजार ७३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.