नवी दिल्ली - रेल्वे सेवांचे विलिनीकरण केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठतेवर परिणाम होणार नसल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले. पदावरील नियुक्त्या या अधिकाऱ्याच्या केडरवर नसल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांना गुणवत्तेवर आणि ज्येष्ठतेवर त्यांना रेल्वे मंडळाचे सदस्य होण्याची समान संधी असणार आहे. त्यांची बढती आणि सेवाज्येष्ठता यासाठी पर्यायी यंत्रणा असणार आहे. सर्व ८ हजार ४०० अधिकाऱ्यांचे संरक्षण केले जाणार असल्याचे पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-रेल्वे मंडळाच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; केडरचे होणार विलिनीकरण
केडरचे विलिनीकरण होईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या विशेष सेवेत काम करावे, असे रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी सांगितले आहे. या निर्णयाने एकाही अधिकाऱ्याच्या करिअरचे नुकसान होणार नाही, असेही यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रेल्वेतील सेवांचे विलिनीकरण करण्याच्या निर्णयाने सेवाज्येष्ठता गमवावी लागेल, अशी अधिकाऱ्यांमधून भीती व्यक्त करण्यात येत होती.
हेही वाचा-मुंबईकरांना थंडावा देणाऱ्या लोकलमधून रेल्वेला तब्बल 38 कोटी उत्पन्न