नवी दिल्ली - आरबीआयने येस बँकेवर गुरुवारपासून निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचा फटका आता 'फोन-पे' या पेमेंट सर्व्हिस पुरवणाऱ्या अॅपलाही बसला आहे. आपली सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद असल्याचे 'फोन-पे'ने एका ट्विटमध्ये सांगितले आहे. फोन पे अॅपची येस बँक ही पार्टनर बँक आहे.
"आमची सेवा तात्पुरत्या काळासाठी बंद आहे. अनियोजित देखभाल क्रिया सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोईबाबत आम्ही दिलगीर आहोत. आम्ही लवकरच पुन्हा सेवा सुरू करू." अशा आशयाचे ट्विट फोन-पे ने केले आहे.
फोन-पे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी मात्र, येस बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हे झाले असल्याचे म्हटले आहे. एका ट्विटमध्ये ते म्हटले, "विस्कळीत सेवेसाठी आम्ही दिलगीर आहोत. आमच्या भागीदार बँकेवर (येस बँक) आरबीआयने निर्बंध लादले आहेत. आम्ही सर्व लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याकरता मेहनत घेत आहोत. तुम्ही राखत असलेल्या संयमाबाबत आभार."