नवी दिल्ली - केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी साखरेच्या किमान आधारभूत किमतीत प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे साखरेचा दर प्रति किलो किमान ३१ रुपये राहणार आहे.
साखरेचे दर वाढणार, किमान आधारभूत किमतीत प्रति किलो २ रुपयाने वाढ
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ४ हजार ७९२ कोटी थकित
साखरेच्या विक्रीचे दर वाढणार असल्याने साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची सुमारे २० हजार १६७ कोटी रुपयांची देणी चुकवता येणार आहे. साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी देता यावीत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की नफ्यात घट झाल्याने किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करावी, अशी मागणी साखर कारखानदारांकडून करण्यात येत होती. किमान आधारभूत किंमत वाढल्याने त्यांच्या तोट्याचे नुकसान कमी होणे शक्य होणार आहे.
अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार १३ फेब्रुवारीपर्यंत साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे २० हजार १६७ कोटी रुपयांची देणी थकलेली आहेत. यामध्ये उत्तरप्रदेशमधील कारखान्यांकडे ७,२२९ कोटी, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे ४ हजार ७९२ कोटी, तर कर्नाटकमधील साखर कारखान्यांकडे ३ हजार ९९० कोटी थकित आहेत.
साखर उद्योग संकटात-
देशातील साखरेचे उत्पादन वाढल्याने साखरेचे भाव घसरले आहेत. त्यामुळे साखर उद्योग आर्थिक संकटात आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने साखरेची निर्यात वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत.