मुंबई- राज्यातील आघाडीच्या उद्योगपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचे आश्वासन दिल्याचे हिदुंजा ग्रुपचे उपाध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत, असे उद्योगपतींना आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर परराज्यातील उद्योग हे गुंतवणूक करण्यासाठी राज्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या ब्ल्यूप्रिंटमध्ये औद्योगिक प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा, रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी पर्यटनाला प्रोत्साहन, उद्योगानूकलता वाढविण्यासाठी धोरणस्नेही प्रशासन या गोष्टींचा समावेश आहे.
गोपीचंद हिंदुजा म्हणाले, मुख्यमंत्र्यांबरोबरील भेट ही खऱ्या अर्थाने संस्मरणीय होती. राज्य १ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होवू शकते, असे व्हिजन आणि रोडमॅपमधून दिसून येते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकेल, असा विश्वास हिंदुजा यांनी व्यक्त केला.