नवी दिल्ली - देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकी इंडियाने एप्रिल २०२० पासून डिझेलवर चालणाऱ्या कारची निर्मिती आणि विक्री बंदी करणार असल्याचे सांगितले आहे. एप्रिल २०२० पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-६’ नियम लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नव्या प्रदूषण विषयक नियमांमुळे डिझेल वाहने निर्मितीतील खर्च वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या मारुती कंपनीकडून डिझेलवर चालणाऱ्या अनेक वाहनांची विक्री आणि उत्पादन केले जात आहे. भारतात या एकट्या कंपनीकडून जवळपास २३ टक्के डिझेल वाहनांची विक्री होते. एप्रिल २०२० पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-६’ नियमावली लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नवीन प्रदूषणविषयक नियमांचे पालन करताना डिझेल वाहनांचा उत्पादन खर्च वाढेल. त्यामुळे ग्राहकांना डिझेल गाड्या वापरणे व्यवहार्य ठरणार नाही, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले.