नवी दिल्ली/श्रीनगर- विमान तिकिटांचे दर सर्वसाधारण (अॅव्हरेज) असताना अचानक श्रीनगरहून जाणाऱ्या विमान तिकिटांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रेकरून लवकरात लवकर परत जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे.
श्रीनगर-दिल्ली विमान तिकिटीचे दर हे ३ हजार ते ५ हजार रुपयापर्यंत असतात. मात्र, विस्तार एअरलाईन्सने शनिवारी रात्रीपासून ३७ हजार ९९५ रुपये तिकिटाचा दर ठेवला आहे. स्पॉट बुकिंगच्या तिकिटांचे दर शुक्रवारपासून वाढले आहेत. क्लिअरट्रीप, यात्रा, मेक माय ट्रिप या विमान तिकिट नोंदणी करणाऱ्या कंपन्यांनी विमान तिकिटांचे दर हे २ हजार ते १५ हजार रुपयांनी वाढविले आहेत.
विमान तिकिटांचे दर आणखी वाढण्याची शक्यता-
श्रीनगरहून असलेल्या आणि श्रीनगरला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे इक्सिगोचे सहसंस्थापक रजनीश कुमारांनी सांगितले. सध्याची गोंधळाची स्थिती पाहता तिकिट नोंदणीचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. श्रीनगरमधून बाहेर पडण्यासाठी पर्यटकांनी घाई केल्याने दर वाढत असल्याचे यात्रा डॉट कॉमचे सीओओ शरत ढाल यांनी सांगितले. विमान कंपन्यांनी अतिरिक्त विमान उड्डाणांसाठी तयार राहावे, अशी तोंडी सूचना नागरी विमान वाहतूक विभागाचे महासंचालकांनी विमान कंपन्यांना केली आहे.
सध्या येथून होणाऱ्या विमान उड्डाणांची कमतरता नाही. मात्र, अतिरिक्त विमानांची उड्डाणे सुरू झाली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये नियोजित विमानांची उड्डाणे पूर्ण क्षमतेने होते आहेत. त्यामुळे विमान सेवेवर ताण पडत असताना तिकिटांचे दर वाढले आहेत. अद्याप, विमान तिकिटांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विमान कंपन्यांना सरकारकडून निर्देश देण्यात आलेले नाहीत.