नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मोठा व्यापारी करार होण्याची शक्यता नाही. असे असले तरीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
दोन्ही देशांमधील संरक्षण, दहशतवादाची समस्या आणि उर्जा क्षेत्र यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे माजी राजदूत राजीव भाटिया यांनी सांगितले. परराष्ट्रसंबंध तज्ज्ञ राजीव भाटिया यांनी गेली तीस वर्षे भारताच्या विदेशातील महत्त्वांच्या मोहिमांसाठी काम केले आहे. भाटिया हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत आशावादी आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत. त्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचा लक्ष लागलेले असणार, असे भाटिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. चीन, दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये समान दृष्टीकोनातून बांधणी करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट सहाय्यकारी ठरणार आहे.