नवी दिल्ली- आर्थिक वर्ष संपत असताना ३१ मार्चला रविवार आहे. करदात्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राप्तीकर आणि जीएसटी कार्यालये रविवारी व शनिवारी सुरू राहणार आहेत.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क कार्यालयाने (सीबीआयसी) सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करदात्यांना मदत व्हावी म्हणून सप्ताह अखेर असतानाही ३० व ३१ मार्चला कार्यालये सुरू ठेवावीत, असे सीबीआयसीने म्हटले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ३० व ३१ मार्चला अतिरिक्त काउंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्ष २०१८ -२०१९ हे ३१ मार्चला संपत आहे. अशा स्थितीत देशातील सर्व प्राप्ती कार्यालये सुरू राहणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.
महसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात ११.४७ कोटींचे जीएसटी महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे.फेब्रुवारीपर्यंत जीएसटी महसुलाचे उद्दिष्ट हे १०.७० लाख कोटी एवढे पूर्ण झाले आहे. २३ मार्चपर्यंत प्रत्यक्ष करातून सीबीडीटीला १०.२१ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. हे एकूण उद्दिष्ट असलेल्या १२ लाख कोटींच्या ८५.१ टक्के एवढे आहे. हे उद्दिष्ट अधिकाधिक पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना सीबीडीटीने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मार्चअखेर असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ३० व ३१ मार्चला बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.