शेनझेन - अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनच्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून उत्पादने आयात करण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात हुवाईने अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली आहे. हुवाई उत्पादनांच्या खरेदीवर बंदी घालणारा निर्णय रद्द करावा, अशी हुवाईने न्यायालयाकडे मागणी केली आहे.
खटला चालविल्याशिवाय न्यायाधीशांना निर्णय देता यावा, म्हणून हुवाईने न्यायालयात 'मोशन फॉर समरी' दाखल केला आहे. न्यायव्यवस्था हे न्यायसंरक्षण मिळविण्याचा शेवटचा मार्ग आहे. अमेरिकेच्या स्वंतत्र अशा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण कायद्यातील चुकामध्ये न्यायालय सुधारणा करेल, अशी आशा असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
बंदूक नसेल, तर धूरही नाही-
हुवाईच्या उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी पुरावे देण्यात अमेरिकन काँग्रेस अपयशी ठरल्याचेही कंपनीने न्यायालयात म्हटले आहे. हुवाईची उत्पादने सुरक्षेला धोका असल्याचे पुरावे अमेरिकन सरकारने दिले नाहीत. जर बंदूक नसेल, तर धूरही नाही, असे सूचक वक्तव्य हुवाईचे कायदेशीर अधिकारी साँग लियूपिंग यांनी केले आहे.
व्यापारी युद्धामुळे हुवाईची कोंडी-
अमेरिका-चीनमध्ये व्यापारी युद्ध सुरू आहे. व्यापारी तडजोडीबाबतची बोलणी फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. त्याचा सर्वात अधिक फटका हुवाई कंपनीला बसला आहे.