नवी दिल्ली - केंद्र सरकार १५ मार्चपासून कांदा निर्यातीला परवानगी देणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.
कांदा निर्यातीला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे पियूष गोयल यांनी ट्विट केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कांदे निर्यातीवर लागू केलेली बंदी केंद्र सरकारने मागील आठवड्यात उठविली आहे. कांद्याच्या दराने सप्टेंबर २०१९ मध्ये शंभरी गाठल्याने केंद्र सरकारने कांदे निर्यातीवर बंदी लागू केली होती. रबी हंगामात कांद्याचे मोठे उत्पादन होणार असल्याने कांद्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नाशिकच्या खासदार दिल्लीच्या भेटीला; पियुष गोयल यांचे पंधरा दिवसांत कांदा निर्यात बंदी उठवण्याचे आश्वासन
कांद्याचे दर आता स्थिर झाले आहेत. मार्चमध्ये कांद्याचे उत्पादन ४० लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मार्चमध्ये २८.४ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते, असे केंद्रीय अन्न मंत्री राम विलास पासवान यांनी ट्विट केले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदे उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कांदे उत्पादनांचे नुकसान झाले होते.
संबंधित बातमी वाचा-कांद्याचे दर घसरल्याने नाशिकमध्ये शेतकरी संतप्त; लिलाव अर्धा तास बंद
कांद्याचे दर कोसळले-
दरम्यान, कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आशियामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे आहे. या बाजारात कांद्याचा दर प्रति क्विटंल कमीत कमी १,४०० रुपये आहे. तर जास्तीत जास्त १,६०० रुपये आहे. शनिवारच्या तुलनेत कांद्याचे दर ५०० रुपयांनी कमी झाले आहेत.