नवी दिल्ली - आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना केंद्र सरकारने चांगली संधी आणि आव्हानही दिले आहे. आरोग्य सेतू अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटी शोधून काढणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले आहे. सरकारने अॅपचा सोर्स कोड (संगणकीय आज्ञावली) खुली करणार असल्याचे म्हटले आहे.
आरोग्य सेतू एवढी ओपन सोर्सची माहिती जगातील कोणत्याच सरकारने जाहीर केली नसल्याचे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले. पारदर्शकता, गोपनीयता आणि सुरक्षा हे आरोग्य सेतू अॅपच्या संरचेनेचे मुख्य तत्वे आहेत.
नॅशनल इन्फॉर्मिटिक्स सेंटरचे संचालक नीती वर्मा म्हणाल्या, की अॅपमधील तीन प्रकारच्या श्रेणीमधून त्रुटी काढणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहेत. तर कोड (आज्ञावली) सुधारणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. आरोग्य सेतू अॅपचा सोर्स कोड हा गिफ्टहबला मध्यरात्री १२ नंतर खुला होणार आहे.