नवी दिल्ली - केंद्र सरकार रेल्वे वित्तीय कॉर्पोरेशनची (आयआरएफसी) प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) भांडवली बाजारात आणणार आहे. यातून सप्टेंबरपर्यंत १ हजार कोटी रुपये जमविण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.
आयआरएफसीच्या रोख्यातून १ हजार कोटी जमविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट
प्रारंभिक भागविक्री आणण्यात येणारा आयआरएफसी हा भारतीय रेल्वेचा वित्तीय विभाग आहे. त्यातून रेल्वेसाठी भांडवली बाजारातून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यात येतात.
आयआरएफसी म्हणजे इंडिय रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही रेल्वेची कंपनी आहे. त्यातून रेल्वेसाठी भांडवली बाजारातून आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यात येतात. तसेच रेल्वेच्या कामांचा विस्तार आणि चालू कामे करण्यासाठी कर्ज घेतली जातात. प्रारंभिक भागविक्रीच्या प्रक्रियेसाठी आयआरएफसी हे सेबीशी संपर्क साधणार आहे. त्यासाठी ड्राफ्ट तयार करण्यात येत आहे. तसेच व्यापारी बँकेची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
गुंतवणूक आणि सरकारी मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) विभाग हा आयआरएफसीची प्रारंभिक भागविक्री करण्यासाठी सकारात्मक आहे. गुंतवणूकदार आयआरएफसीमध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक असल्याचे डीआयपीएएमला आढळून आले आहे. चालू वर्षात १० सरकारी संस्थांची प्रारंभिक भागविक्री करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे चालू वर्षात निर्गुंतवणुकीतून १.०५ लाख कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.