नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील २४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील ६२ शहरात नवी २ हजार ६३६ चार्जिंग स्टेशन सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही मंजुरी फेम इंडियांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढविण्याकरता प्रोत्साहन होण्यासाठी देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
केंद्रीय अवजड मंत्रालयाने फेम इंडिया योजनेंतर्गत (टप्पा २) विविध शहरात चार्चिंग स्टेशन सुरू करण्यासाठी इच्छुकांच्या निविदा मागविल्या होत्या. याबाबत माहिती देताना प्रकाश जावडेकर म्हणाले, नवीन चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर निवडक शहरांमध्ये ४ किलोमीटरच्या टप्प्यात कमीत कमी एक स्टेशन असेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांचा विश्वास वाढेल. तसेच त्यांना नवीन इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सध्या, चार्जिंगची पायाभूत सुविधा नसल्याने त्यांना चिंता वाटत होती, असेही प्रकाश जावडेकर म्हणाले. महाराष्ट्रात ३१७ चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-टाटा-मिस्त्री प्रकरण : कंपनी निबंधकांच्या याचिकेवरील एनसीएलएटीचा निकाल राखीव
काय आहे फेम इंडिया योजना?
फेम इंडिया (फास्टर अॅडोप्शन अँड मॅन्युफॅक्च्युअरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हिक्लस इन इंडिया) ही केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी योजना सुरू केली आहे. यामध्ये देशातील विविध शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे.