नवी दिल्ली- अतिरिक्त साठा असल्याने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांसाठी आगामी तीन महिन्यात सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढे असताना निर्यात करता येणार आहे. त्यानंतर मात्र, साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या, देशात साखरेचा अतिरिक्त साठा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांना निर्यात करणे सुलभ झाले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आगामी तीन ते चार महिने हे साखर कारखान्यांसाठी महत्त्वाचे आहेत. या दरम्यान साखर निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होणार आहे. कारण तीन-चार महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलची साखर पोहोचणार आहे.
इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनचे (आयएसईसी) व्यवस्थापकीय संचालक अधीर झा म्हणाले, ब्राझील येत्या काळात इथॉनॉलहून अधिक साखरेचे उत्पादन घेण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढणार आहेत. ब्राझीलला इथेनॉलपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक फायदेशीर ठरणार आहे.