जळगाव - सुवर्णनगरी असलेल्या जळगावात सोमवारी सोन्याचे दर प्रतितोळा ३८ हजार ८०० ते ३९ हजार रुपये इतका नोंदविण्यात आला. सतत सोन्याचे दर वाढत असल्याने जळगावामधील सराफ बाजारावर मंदीचे सावट आहे.
दरवर्षी साधारणत: अक्षयतृतीयेनंतर सोन्याची मागणी कमी होते. त्यामुळे भावही कमी होतात. मात्र यंदा जीएसटीसह विचार केला तर सोन्याच्या दरांनी ४० हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सराफ बाजारावर मंदीचे सावट आहे.
सराफ बाजारावर मंदीचे सावट
हे आहे सोन्याचे दर वाढण्याचे कारण-
दोन आर्थिक महासत्ता असलेल्या चीन आणि अमेरिका या देशांमध्ये सुरू असलेले व्यापारी युद्ध, सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या व्यापारी घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या स्थानिक बाजारपेठेवर होत असतो. त्यामुळे स्थानिक सुवर्ण बाजारपेठेला मंदीची झळ सोसावी लागत असल्याचे आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना यांनी सांगितले. सध्या ४० हजार रुपयांवर असलेले सोन्याचे दर महिनाभरात ४१ ते ४२ हजार रुपये प्रतितोळा असतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
पावसाळ्यात सोने खरेदीचा हंगाम नसतो. त्यामुळे सुवर्ण बाजारात उलाढाल अत्यल्प असते. अशी परिस्थिती असतानाही सोन्याची दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र आहे. ग्राहक नसल्याने सराफ व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत.
येत्या काही दिवसात येणाऱ्या सणानिमित्त ग्राहकांकडून मोठ्य़ा प्रमाणात सोने-चांदी खरेदी केली सराफांना अपेक्षित आहे. परंतु, सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर ग्राहक सोने खरेदी करणार नाहीत, अशी भीती सुवर्ण व्यावसायिकांना आहे. सणवार येण्याआधीच सोन्याचे दर ४० हजारांवर पोहचले आहेत. यापुढेही अशीच दरवाढ सुरू राहिली तर सराफ बाजाराला मोठी झळ पोहोचण्याची शक्यता आहे.