नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा भडका उडाला असताना ग्राहकांना मे महिन्यातही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. येत्या दोन आठवड्यात खनिज तेल कंपन्या किरकोळ विक्रीत दर वाढ करण्याची शक्यता आहे.
चालू महिन्यात पेट्रोल व डिझेलची दरवाढ ही प्रति लिटर 60 पैशांहून कमी असणार आहे. खनिज तेल मार्केटिंग कंपन्यांनी 83 दिवसानंतर म्हणजे 16 मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ 7 जूनपासून करण्यास सुरुवात केली. गेल्या नऊ दिवसात पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेलच्या किमती प्रति लिटर 5.23 रुपयांनी वाढल्या आहेत.
सरकारी खनिज तेल मार्केटिंग कंपनीमधील सूत्राच्या माहितीनुसार पेट्रोलियम उत्पादनांचे दर हे जून अखेरपर्यंत वाढत राहणार आहेत. मात्र, ही दरवाढ प्रति लिटर 30 ते 40 पैसे असणार आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या बॅरलचा दर पुन्हा 40 डॉलरहून कमी झाला आहे. त्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांचे दरही अंशत: घसरले आहेत. हीच परिस्थिती काय राहिली तर पुढील महिन्यापासून पेट्रोल व डिझेलचे दर कमी होवू शकतात, असे सूत्राने सांगितले.
इंधन दरवाढीचा सामान्यांना फटका
दरम्यान, देशभरात टाळेबंदी सुरू असल्याने अनेक उद्योग व सामान्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने टाळेबंदी 1खुली करताना अनेक नियम शिथील केले आहेत. मात्र, उद्योग, व्यवसायसह अनेक खासगी कार्यालये सुरू होताना इंधन दरवाढ होत आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर हे ऑगस्ट 2014 च्या पातळीपर्यंत कमी करावे, अशा विविध मागण्या केल्या आहेत. तर वाहतूकदारांची संघटना ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्टनेही इंधनाच्या दरवाढीचा निषेध केला होता. कोरोनाच्या संकटात त्रस्त असलेल्या नागरिकांना पुन्हा महागाईला सामोरे जावे लागले, असे ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्टने म्हटले होते.