नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा आज सायंकाळी ४ वाजता करणार आहेत. सीतारामन यांनी गुरुवारी स्थलांतरित मजूर, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते, लघू व्यापारी व लहान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा केल्या आहेत.
निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजुरांना दोन महिन्यांसाठी अन्नधान्य, एक देश, एक रेशनकार्ड, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटींचे कर्ज अशा घोषणा गुरुवारी पॅकेजमध्ये केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण जीडीपीच्या दहा टक्के म्हणजे सुमारे २० लाख कोटींचे पॅकेज देण्यात येणार असल्याची मंगळवारी घोषणा केली. यामध्ये गरिबांना १.१७ लाख कोटींच्या पॅकेजचा समावेश आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनाची तरलता वाढविण्यासाठी ५.६ लाख कोटींचे जाहीर केलेल्या पॅकेजचा समावेश आहे.