नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सरकारी व खासगी बँकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीदरम्यान एमएसएमई, ऑटोमोबाईल क्षेत्राला होणारा वित्तपुरवठा आदी विषयांची चर्चा करण्यात येणार आहे.
साधारणत: केंद्रीय अर्थमंत्री सरकारी बँका व खासगी संस्थांची बैठक घेतात. मात्र वित्त मंत्रालयाने यावेळी खासगी बँकांच्या प्रमुखांनाही बैठकीसाठी बोलाविले आहे. बैठकीमध्ये एमएसएमई, किरकोळ क्षेत्र, ऑटोमोबाईलसह परवडणाऱ्या दरातील घरांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत आढावा घेतला जाणार आहे. विकासदराला गती देण्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि गृहकर्ज संस्थांना येत्या काही दिवसात प्रोत्साहन देणार असल्याचे वित्तमंत्रालयाने म्हटले आहे. सूत्राच्या माहितीनुसार बैठकीला महसूल आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिवही उपस्थित राहणार आहेत.