इंदूर - महिंद्रा अँड महिंद्राचे (एम अँड एम) व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी वाहन उद्योगात सुधारणा होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. आगामी सण उद्योगासाठी निर्णायक ठरणार असल्याचेही गोयंका यांनी म्हटले आहे.
पवन गोयंका म्हणाले, गेल्या १२ महिन्यात वाहन उद्योगात मंदी दिसून आली आहे. मात्र सरकारने आर्थिक सुधारणा केल्यापासून ६ जूलैपासून अर्थव्यवस्था बदलली आहे. मंदावलेली स्थिती जावून सकारात्मकता येत असल्याचे गोयंका यांनी माध्यमांना सांगितले. पुढे ते म्हणाले, बँकांच्या वित्तीय पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. तसेच देशाच्या बहुतेक भागात चांगले पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे नवरात्रपासून वाहन उद्योगाच्या बाजारपेठेत सुधारणा होईल, अशी आशा आहे.
नवरात्रपासून सहा आठवड्याचा उत्सव सुरू होत आहे. जर विक्री ही प्रोत्साहनात्मक राहिली तर वाहन उद्योग खूप वेगाने यश मिळवेल, असेही गोयंका म्हणाले.