नवी दिल्ली - २००८ मधील जागतिक मंदीचे अचूक भाकित वर्तविणारे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सध्याच्या अर्थव्यवस्थेवर मत व्यक्त केले आहे. देशातील मंदावलेली आर्थिक स्थिती ही खूप चिंताजनक असल्याचे राजन यांनी म्हटले. यावर सरकारने तातडीने उपाय करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसह खासगी क्षेत्रामध्ये उर्जेच्या स्वरुपात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या सुधारणा कराव्या लागणार असल्याचे राजन म्हणाले. पुढे ते म्हणाले, खासगी क्षेत्राच्या विश्लेषकांनुसार सरकारच्या अंदाजापेक्षा विविध क्षेत्रांच्या प्रगतीची आकडेवारी कमी आहे. सध्याची मंदावलेली अर्थव्यवस्था खूप चिंताजनक असल्याचे वाटते. तुम्ही सर्व व्यवसायामधून चिंता आणि तक्रारीचा सूर ऐकू शकता. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व विकास दर वाढविण्यासाठी नव्या व ताज्या सुधारणा हव्या असल्याचे ते म्हणाले.
सरकारी रोखे विदेशात विकून कर्ज घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आला होता. याबाबत ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारामधून कर्ज घेणे ही खऱ्या अर्थाने सुधारणा नाही. तर ती केवळ युक्तीसाठी केलेली कृती आहे.
जीडीपी मोजण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचा गट नेमण्यात यावा-
जीडीपी हा फुगवून सांगण्यात आल्याचा दावा पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी संधोधनामधून केला होता. याची आठवणही रघुराम राजन यांनी करून दिली. जीडीपीची आकडेवारी काढण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचा गट नेमण्यात यावा, असे त्यांनी सूचविले. जीडीपीची आकडेवारी चुकीची नसल्याची खात्री करायला हवी. त्यातून चुकीच्या धोरण व कृती घडते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जगभरात २००८ मध्ये आर्थिक मंदी येणार असल्याचे अचूक भाकित रघुराम राजन यांनी केले होते. पुन्हा एकदा मंदी येणार आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, वित्तीय संकटाचा अंदाज करू शकत नाही. मात्र ते आल्यास वेगळ्या स्त्रोमधून येईल.
वित्तीय क्षेत्रात अतिउत्साह (मॅनिया) असणे, ही मोठी समस्या नाही. तर व्यापार आणि जागतिक गुंतवणूकीकडे लक्ष दिले नाही तर जुन्या जागतिक मागण्या (ग्लोबर ऑर्डर) या खिडकीमधून बाहेर जाणार आहेत. ही खरी समस्या आहे. जुन्या समस्या सोडविल्याने नव्या समस्यांना रोखू शकणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.