नवी दिल्ली - भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही गुजरात, आसाम, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशा राज्यांना पाठविल्याची माहिती दिली आहे. नुकतेच दिल्ली सरकारने भारत बायोटकेकडून लशीचा पुरवठा होत नसल्याची तक्रारी केली होती. भारत बायोटेकने केरळ आणि उत्तराखंडलाही लस रवाना केल्याचे सांगितले.
कोव्हॅक्सिन ही गांधीनगर, गुवाहाटी, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि भुवनेश्वरला पाठविण्यात आली आहे. रमझानच्या पवित्र महिन्यात काम करणाऱ्या भारत बायोटेकच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार, असे भारत बायोटेकच्या सहसंस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-लशींचा तीव्र तुटवडा असल्याने मोठे संकट; फिक्कीने सरकारला 'हे' सूचविले उपाय
आम्ही मिशनपासून थांबणार नाही- भारत बायोटेक
गुरुवारी रात्री ट्विट करत इल्ला यांनी केरळ आणि उत्तराखंडमधून मागणी जास्त असल्याने पुरवठा करण्यात आल्याचे म्हटले होते. कोव्हॅक्सिन ही केरळ आणि उत्तराखंडला पाठविण्यात आली आहे. अनेकांनी मदत करण्याची तयारी दर्शविली, तुमचे आभार. आमचे काम अत्यंत कठोर, रिअलटाईम आणि तांत्रिक आहे, घरातून काम नाही! आमचे सर्व कर्मचारी काळजी घेत आहेत. आम्ही मिशनपासून थांबणार नाही. चला नेहमी कृतज्ज्ञ, मदत करण्यासाठी तयार राहू आणि नेहमी आशावादी होऊ, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यांना किती प्रमाणात लशींचा साठा वितरित केला, याची माहिती इल्ला यांनी ट्विटमध्ये दिली नाही.
हेही वाचा-सलग दुसऱ्या वर्षी अक्षयतृतीयेला 'लॉकडाऊन'; सराफ व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे होणार नुकसान
दिल्ली सरकारने भारत बायोटेकविरोधात केली होती तक्रार-
भारत बायोटेक ही राजधानीला लशींचे डोस देऊ शकत नसल्याचे पत्रात नमूद केले होते, ही माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी १२ मे रोजी दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देत इल्ला यांनी काही राज्यांकडून कोव्हॅक्सिनच्या पुरवठ्याबाबत तक्रार होणे हे खूप वेदनादायी असल्याचे म्हटले होते. तसेच कोव्हॅक्सिन ही १० मे रोजी १० राज्यांना देण्यात आल्याचे म्हटले होते.