नवी दिल्ली- बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या पगारी वेळेवर मिळतील, असा विश्वास कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. भांडवलासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बीएसएनएलला १ हजार ५०० कोटींचे कर्ज मिळणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
केंद्र सरकारने लेटर ऑफर कम्फर्टची मर्यादा वाढवून सरकारी कंपन्यांना ३ हजार ५०० कोटीपर्यंतचे कर्ज सरकारी बँकांकडून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बीएसएनएलसारख्या सरकारी कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. कंपनीच्या गरजेनुसार इतर आर्थिक मदत जुलैअखेर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसबीआयकडून मध्यम कालापुरते दिले जाणारे कर्ज हे कामकाजाचा खर्च आणि भांडवलासाठी वापरले जाणार आहे. कर्ज फेडण्यासाठी जमिनीची पुरेशी मालमत्ता आणि आर्थिक निधीचा ओघ असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएसएनल आर्थिक संकटावर २०१९-२० च्या सप्टेंबर तिमाहीपर्यंत मात करू शकेल, असा कंपनीच्या व्यवस्थापनाला विश्वास आहे. बीएसएनएलच्या संचालकांनी सर्व सर्कलच्या मुख्य व्यवस्थापकांना १६ मे ला पत्र पाठविले आहे. दूरसंचार क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून स्पर्धक कंपन्यांचे अत्यंत कमी दर असल्याने महसूल कमी मिळत असल्याचे त्या पत्रात नमूद केले आहे. बीएसएनलबरोबर सरकारी कंपनी असलेल्या एमटीएनएलदेखील आर्थिक संकटात आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार स्वेच्छानिवृत्ती, मालमत्तेतून पैसा उभा करणे आणि ४ जी स्पेक्ट्रमचे वाटप असे विविध उपाय करत आहे.
बीएसएनएलला कर्ज मिळण्यासाठी दूरसंचार विभागाने लेटर ऑफ कॉम्फर्टची मर्यादा वाढवून दिली आहे. बीएसएनएलमध्ये सुमारे १.६८ लाख कर्मचारी आहेत. फेब्रुवारीपासून बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारी मिळत नसल्याचे समोर आले होते.