नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला (पीएलआय) मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे अन्न प्रक्रिया उद्योगांना 10,900 कोटी रुपयांची सवलत मिळू शकणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेत अन्न प्रक्रिया उद्योगांना सहा वर्षापर्यंत 10,900 कोटी रुपयांची सवलत मिळू शकणार आहे. ते म्हणाले की, या योजनेतून 2.5 लाख रोजगारनिर्मिती होऊ शकणार आहे. प्रत्यक्षात या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने नोव्हेंबरमध्ये तत्वत: मंजुरी दिली होती. केंद्र सरकारने दहा क्षेत्रांसाठी 1.45 लाख कोटी रुपयांची पीएलआय योजना जाहीर केली आहे. यामध्ये वाहन उद्योग, औषधी उत्पादन आणि दूरसंचार उत्पादन आदींचा समावेश आहे.