नवी दिल्ली - सर्व वाहन उद्योगातील कर हा १८ टक्के वर्गवारीत आणावा, अशी मागणी वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योगाची संघटना एसीएमएने केली आहे. यामुळे मंदी भेडसावणाऱ्या वाहन उद्योगाला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा एसीएमएने केली आहे. अन्यथा सुमारे १० लाख नोकऱ्या गमाविल्या जातील, अशी संघटनेने भीती व्यक्त केली.
वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योगातून ५० लाख लोकांना रोजगार दिला जातो. एसीएमए संघटनेने वाहनांच्या इलेक्ट्रिक संक्रमणाच्या निर्णयाबाबत धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
कधी नव्हे तेवढ्या प्रमाणात वाहन उद्योग हा मंदीला सामोरे जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत घसरण झाल्याचे एसीएमएचे अध्यक्ष राम वेंकटरमनी यांनी सांगितले. वाहन उद्योगावरच वाहनांचे सुट्टे भाग निर्माण करणाऱ्या उद्योगाची प्रगती अवलंबून असते. सध्या १५ ते २० टक्के वाहनांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर १० लाख जणांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, अशी त्यांनी भीती व्यक्त केली.