नवी दिल्ली - देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्राला दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशांतर्गत विमान वाहतूक ८० टक्के क्षमतेने करण्याची परवानगी दिल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी माहिती दिली आहे. यापूर्वी विमान वाहतूक ७० टक्के क्षमतेने केंद्राने परवानगी दिली होती.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी म्हणाले, की देशांतर्गत विमान वाहतुकीत ३० हजार प्रवाशांनी २५ मे रोजी प्रवास केला आहे. हे प्रमाण वाढून ३० नोव्हेंबरला २.५२ लाख झाले आहे.
हेही वाचा-सोन्याची झळाळी पडतेय फिकी; जागतिक बाजारातील चढ-उताराचा परिणाम
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीची क्षमता ७० टक्क्यांवरून ८० टक्के केली आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने विमान कंपन्यांना वाहतुकीच्या ७० टक्के क्षमतेने सेवा देण्याची परवानगी दिली होती. जूनमध्ये विमान वाहतुकीची क्षमता ३३ टक्क्यांवरून ४५ टक्के करण्यात आली होती.
हेही वाचा-नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावर आरबीआयचे एचडीएफसी बँकेवर निर्बंध
महामारीमुळे देशांतर्गत विमान सेवा होती ठप्प
कोरोना महामारीच्या संकटामुळे देशात केंद्र सरकारने मार्चमध्ये टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवा ही २५ मार्चपासून स्थगित करण्यात आली होती. ही सेवा २५ मेपासून पूर्ववत करण्यात आली आहे.