यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गत चार दिवसांत रोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरी पार करीत आहे. शासनाच्या धोरणानुसार आपण ‘अनलॉक’ प्रक्रियेमध्ये असलो तरी नागरिकांनीसुध्दा जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे अजूनही गांभीर्य नाही. त्यामुळे स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी आतातरी बिनाधास्त वागणे सोडा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.
जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह रुग्णांपासून सुरवात झाली असून आज हा आकडा 1 हजार 865 वर पोहचला आहे. तरीही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. अनेक जण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बिनधास्तपणे फिरताना आढळत आहे. त्यामुळे नागरिकांनी याला गंभीरपणे घ्यावे, असे आवाहन केले.
10 मार्च रोजी जिल्ह्यात सर्वात प्रथम पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. आज ही संख्या 1 हजार 865 वर गेली आहे. यापैकी 1 हजार 250 जण बरे होऊन घरी गेले आहेत. यात 707 पुरुष आणि 543 महिला आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 579 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आणि इतर जिल्ह्यातील पाच जण असे एकूण 584 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात मृत्यूचा आकडा 50 असून 32 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 137 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. जिल्ह्यात प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे 300 नमुन्यांची तपासणी करण्यात येते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही संख्या 140 असून आपल्या जिल्ह्यात 200 टक्के तपासणी होत आहे. त्यामुळे संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग चांगली होते. जिल्ह्यात मृत्युदर हा 2.68 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णाचा दर हा 7.7 टक्के आहे. पॉझिटिव्ह दर हा 10 टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.