हिंगोली- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन फार सतर्क झाले आहे. टाळेबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील केश कर्तनालय अटी व शर्तींच्या अधीन राहून 9 ते 5 या वेळेत सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानाची सुरुवात करताच जागेचे निर्जंतुकीकरण करून केवळ केस कापण्यास परवानगी आहे. या व्यतिरिक्त दाढी करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येऊन दुकानाची मुभा देखील रद्द केली जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच अस्थापने बंद ठेवण्यात आली होती. त्यासोबतच केश कर्तनालय देखील बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे केश कर्तनालय व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, तब्बल 3 महिन्यांनंतर सलून उघडण्याची परवानगी मिळाली आहे.
केश कर्तनालय बंद झाल्याने अनेकांची पंचाईत झाली होती. मात्र, आता कुठे त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, शासनाच्या नियमांचे पालन करणे खूप बंधनकारक आहे. केश कर्तनालय दुकान सुरू करण्यापूर्वी संबंधितांनी संपूर्ण जागेचे निर्जंतुकीकरण करून घेणे गरजेचे आहे. दुकान उघडण्याची परवानगी दिलेली असली, तरीही दुकानात केस कापण्यालाच परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, सदर माहिती दुकानात ठळक अक्षरात लावणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, केश कर्तनालय दुकानात सेवा देताना कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रॉन आणि मास्क आदी साधने वापरणे बंधनकारक आहे. प्रत्येक सेवेनंतर दुकानातील क्षेत्र आणि जमीन पृष्ठभाग, फर्शी प्रत्येक दोन तासाने स्वच्छ, निर्जंतुक करणे गरजेचे आहे. तसेच एक वेळेस टॉवेल्स, नॅपकिनचा वापर करण्यात यावा आणि नंतर त्यांची विल्हेवाट लावावी किंवा ग्राहकाने स्वतः टॉवेल्स, नॅपकिन घेऊन येण्यास कळवावे अशी काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.