जिनिव्हा -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले लॉकडाऊन शिथिल करण्यावरून जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रियसस यांनी युरोपीयन देशांना इशारा दिला आहे. कोरोना अजूनही सर्वत्र पसरत असून युरोपियन देशांनी सुरक्षितता बाळगायला हवी, असे घेब्रियसस म्हणाले.
युरोपियन संसदेची पर्यावरण समिती, सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा विभागाशी जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना सर्वत्र पसरत असून अनेकांना अजूनही संसर्ग होण्याच धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला.
युरोपियन महासंघातील अनेक देश निर्बंधापासून सुट देत असताना घेब्रियसस यांनी हा इशारा दिला आहे. याबरोबरच आफ्रिका, पॅसिफिक खंडातील आणि कॅरेबियन देशांना सहकार्य केल्यावरून डब्यल्यूएचओने युरोपीयन संघांचे आभार मानले. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी या देशांना युरोपीयन संघाने एक नेतृत्त्व दिले, असे घेब्रियसस म्हणाले.
जगभरात कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावरही महासंचालकांनी मत व्यक्त केले. जो कोणताही देश पहिले कोरोनावर लस निर्माण करेल, त्यांनी जगातील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यासाठी राजकीय बांधिलकीची गरज आहे, असे ते म्हणाले.