रायगड- अनंत गीते यांनी कोणतेच काम केले नाही हे मला मान्य आहे कारण त्यांनी कोणती कंपनी उघडली नाही, जमिनी-जुमला घेतला नाही, भ्रष्टाचार केला नाही, कोणाची पिळवणूक केली नाही मात्र सुनील तटकरे यांनी हे सर्व केले असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तटकरे याना मारला आहे.
माणगाव येथे टीएमसी मैदानावर शिवसेना उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा आयोजित केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरे यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीबाबत व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीवर खरपूस टीका केली. यावेळी व्यासपीठावर उमेदवार अनंत गीते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार विनोद घोसाळकर, विलास चावरी, सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख किशोर जैन, जगदीश गायकवाड आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला जिल्हा आहे. त्यामुळे कलंकित असलेल्या सुनील तटकरे यांना मत देऊन आपण भ्रष्टाचारी व्यक्तीला निवडून देऊ नका असे आवाहन केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने हडप करून गब्बर झालेल्या सुनील तटकरे यांच्यासोबत जाऊन मातीशी द्रोह करणाऱ्यांना मदत करू नका अन्यथा ते खड्यात चाललेत तुम्हीही जाल. त्यामुळे वेळीच सावरा असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटील यांना दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, बॅ. ए आर अंतुले याचे सुपुत्र नविद अंतुले हे शिवसेनेत आले असल्याने त्यांनी मुसलमान बंधू भगिनीमधील गैरसमज दूर करण्याचे काम करा असे आवाहन नविद यांना केले आहे. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा केला मात्र गरीब गरीबच राहिले मात्र गांधी घराण्याची गरिबी हटली असा टोलाही काँग्रेसला मारला. 60 वर्षात काँग्रेस ही माजली आहे तर दहा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एवढे घोटाळे केलेत की बाराखडीची अक्षरही कमी पडतील, असा खोचक टोला ठाकरे यांनी मारला. तसेच देशद्रोह करणाऱ्यांवर खटला भरणार नाही आशा लोकांना निवडून देणार का असा सवाल उपस्थित केला.Conclusion:एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांच्यासोबत देशातील मुसलमान नाही आहेत देशप्रेमी मुसलमान आमच्यासोबत आहेत. ओवेसीच्या पक्षाची स्थापना कोणी केली आणि कशासाठी याची माहिती घ्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले मात्र शरद पवार यांनी स्वतः कधी शेतकऱ्यांना मदत केली का असा टोलाही यावेळी पवार यांना मारला.
अनंत गीते हे शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक आहेत. गीते यांचा जमिनीचा संबंध नतमस्तक होण्याचा आहे तर सुनील तटकरेंचा संबध जमीन बळकावण्याचा आहे. ही निवडणूक गीतेना केवळ निवडून देण्यासाठी नाही, धनुष्यबाणाला म्हणजे विकासाला मत यासाठी आहे. त्यामुळे जमिनीवर असणाऱ्या अनंत गीते यांना मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.