जिनिव्हा -अमेरिकेने लक्ष्यभेदी कारवाईत इराणचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांची केलेली हत्या बेकायदेशीर असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. या हत्येसाठी अमेरिकेकडे पर्याप्त पुरावे नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. इराणच्या कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल सुलेमानीला इराकमधील बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने ड्रोनद्वारे लक्ष्यभेदी कारवाईत ठार मारले. ही कारवाई यावर्षी 3 जानेवारीला करण्यात आली होती.
संयुक्त राष्ट्रातील विशेष प्रतिनिधी अॅग्नेस कॉलमार्ड यांनी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेला ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेल्या कारवाईसंबंधी अहवाल सादर केला. अॅग्नेस कॉलमार्ड या न्यायव्यवस्थेच्या बाहेर झालेल्या हत्यांसदर्भात (एक्स्ट्राजुडिशिअल किलिंग) चौकशी करणासाठी नेमलेल्या विशेष प्रतिनिधी आहेत. अमेरिकेने मनमानी पद्धतीने सुलेमानी यांची हत्या केल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे.