महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याच्या मदतीला धावला 'अजिंक्यतारा', एफआरपीनुसार पूर्ण रक्कम अदा - Farmers Kharip Season News

आर्थिक मंदी आणि खरीप हंगामाची सुरुवात अशा कात्रीत सापडलेल्या शेतकर्‍याला अजिंक्यतारा कारखान्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून कारखान्याने हंगामातील तिसरा (प्रतिटन १४० रुपये) हप्ताही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकर्‍यांना बी, बियाणे, खते घेण्यासाठी व शेतीशी निगडित खर्चासाठी मोठा आधार मिळाला आहे.

सातारा अजिंक्यतारा न्यूज
सातारा अजिंक्यतारा न्यूज

By

Published : Jun 10, 2020, 11:44 AM IST

सातारा - शेतकर्‍याने पिकवलेल्या उसाला चांगला दर देतानाच कोरोनासारख्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीला साताऱ्याचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना धावला आहे. कारखाना व्यवस्थापनाने गाळपास आलेल्या ऊसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम अदा केली असून एफआरपीनुसार सर्व रक्कम वेळेत देणारा अजिंक्यतारा कारखाना हा पहिलाच कारखाना ठरला आहे.

आर्थिक मंदी आणि खरीप हंगामाची सुरुवात अशा कात्रीत सापडलेल्या शेतकर्‍याला अजिंक्यतारा कारखान्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून कारखान्याने हंगामातील तिसरा (प्रतिटन १४० रुपये) हप्ताही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकर्‍यांना बी, बियाणे, खते घेण्यासाठी व शेतीशी निगडित खर्चासाठी मोठा आधार मिळाला आहे.

अजिंक्यतारा कारखान्याने या गळीत हंगामात शासन निर्धारित एफआरपी सूत्रानुसार, गाळपासाठी आलेल्या उसाला २ हजार ७९० रुपये प्रतिटन दर दिला. कारखान्याने या हंगामात ६ लाख १२ हजार ९१७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२.८४ टक्के अशा विक्रमी साखर उताऱ्याने ७ लाख ७० हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गाळपास आलेल्या उसाला २ हजार ५०० रुपये प्रतिटन पहिला आणि त्यानंतर १५० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता वेळेत अदा करण्यात आला. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम केले. आता पावसाळा सुरू झाला असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे आदी खरेदीसाठी शेतकरी नेहमीच कारखान्याच्या बिलावर अवलंबून असतो. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, शेतीची कामे खोळंबू नयेत, यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळाने योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून गाळपास आलेल्या ६१२९१७ मे. टन उसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम म्हणजेच १४० रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण ८ कोटी ५८ लाख ८ हजार ६२१ रुपये रक्कम दि. ८ जून रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.

सभासदांना सवलतीत सॅनिटायझर

कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती करून सवलतीच्या दरात हॅन्ड सॅनिटायझर पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. २०० मिली हॅन्ड सॅनिटायझर सभासदांसाठी ३५ रुपये तर विविध संस्था, शाळा, ग्रामपंचायतींसाठी ४५ रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय, ५०० मिलीची बाटली सभासदांसाठी ७० तर इतर संस्थांसाठी ८० रुपये, १ लिटर सॅनिटायझर सभासदांना १२० रुपये तर इतर संस्थांसाठी १५० आणि ५ लिटर सॅनिटायझर सभासदांना ६०० रुपये तर इतर संस्थांसाठी ७२५ रुपयांना उपलब्ध करून दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details