मुंबई - प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज (बुधवार) मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्धाटन करण्यात आहे. कोरोनाचा प्रभाविपणे मुकाबला करण्यासाठी बृह्नमुंबई महानगरपालिकने हे प्लाझ्मा थेरपी युनिट सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यापुढे अभूतपूर्व असे आव्हान उभे राहिले आहे. या प्रसंगात आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिका आणि सरकारी कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी कष्ट करत आहेत, असे सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला.
'जगभरातली संशोधक कोरोनावर लस आणि योग्य उपचार पद्धती शोधण्यासाठी काम करत आहेत. अत्यंत गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी योग्य ठरत आहे. अनेकांचे जीव वाचविण्यासाठी हे सेंटर सुरु केल्याबद्दल महानगरपालिकेचे धन्यवाद' जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करावे. अत्यंत गंभीर रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी यामुळे मदत होईल, असे सचिन तेंडुलकर उद्धाटनावेळी म्हणाला.
या प्लाझ्मा थेरपी युनिटद्वारे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा वापरून इतर गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तात जास्त प्रमाणात अॅन्टिबॉडीज(प्रतिपिंडे) असतात. कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला जर या प्लाझ्मा दिल्या तर त्याच्या शरीरात त्वरीत रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते. त्यामुळे रुग्ण वाचू शकतो.
सार्स, मर्स, एच1एन1 (स्वाईन फ्लू) सारख्या आजारात प्लाझ्मा थेरपी याआधी यशस्वीपणे वापरण्यात आली आहे. भारतामध्ये प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्यांमधून सकारात्मक निकाल पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टरांना नवे शस्त्र मिळाले आहे.