महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची चीनबरोबर काश्मीर मुद्द्यावर चर्चा

भारत चीन सीमावाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांच्याशी फोनवर चर्चा केली. काश्मीर मुद्द्यासह इतर अनेक प्रादेशिक मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

शाह मेहमूद कुरेशी
शाह मेहमूद कुरेशी

By

Published : Jul 4, 2020, 5:08 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांच्याशी फोनवर चर्चा केली. काश्मीर मुद्द्यासह इतर अनेक प्रादेशिक मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सीमा वादावरून भारत चीनचे संबध बिघडले असताना पाकिस्तानने चीनला पाठिंबा दिला आहे. तसेच भारताच्या आक्रमक धोरणामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आल्याची आवई पाकिस्तानने उठवली आहे.

भारताच्या आक्रमक धोरणामुळे प्रादेशिक सुरक्षा खालावली आहे. तसेच शांतता धोक्यात आली आहे. भारतात चिथावणीखोरपणे वागत असतानाही पाकिस्तान संयम बाळगून आहे. मात्र, भारत कायम शस्त्रसंधीचे उल्लघंन करत असल्याचा आरोप कुरेशी यांनी केला. काश्मीरात दहशतवादी कारवायांत गुंतले असताना पाकिस्तानकडून चोराच्या उलट्या बोंबा मारायचे काम सुरू आहे.

भारत काश्मीरातील लोकसंख्येत बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने काश्मिरातील अधिवास कायद्यात बदल केला आहे. हे संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचे कुरेशी म्हणाले. मात्र, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून पाकिस्तानने किंवा इतर कोणीही त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

चिनी गुंतवणुकीवर पाकिस्तानात तयार करण्यात येत असलेल्या सीपीईसी कॉरिडॉरच्या कामावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. हा रस्ता पाक व्याप्त काश्मीरातून जात असल्याने भारताने या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. कुरेशी यांनी ‘वन चायना पॉलिसी’लाही पाठिंबा दिला. आशिया आणि पॅसिफिक खंडात चीनच्या आक्रमक धोरणामुळे अनेक देश त्रस्त असताना पाकिस्तान फक्त भारत विरोधामुळे चीनला पाठिंबा देत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details