महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 28, 2020, 6:03 PM IST

ETV Bharat / briefs

महिलांसाठी विशेष विलगीकरण केंद्र उभारा, मनसेची मागणी

मागील आठवड्यात पनवेल येथील क्वारंटाईन सेंटर येथे महिलेवर झालेल्या बलात्काराची संतापजनक घटना लक्षात घेता, पुन्हा असले प्रकार घडू नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडुप विभागाच्या वतीने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली आहे.

Mns demand women quarantine centre
Mns demand women quarantine centre

मुंबई- विलगीकरण कक्षातील महिला देखील असुरक्षित वातावरणात राहत असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत मनसेने महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

मागील आठवड्यात पनवेल येथील क्वारंटाईन सेंटर येथे महिलेवर झालेल्या बलात्काराची संतापजनक घटना लक्षात घेता, पुन्हा असले प्रकार घडू नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडुप विभागाच्यावतीने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी एस विभागातील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्या, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, भांडुप विभागाच्या वतीने एस विभागचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांना देण्यात आले. तसेच या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

त्याचबरोबर, महिलांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारावे, अगदीच शक्य नसल्यास महिलांना क्वारंटाईन करताना कुटुंबातील सदस्य कुणी सोबत नसल्यास त्यांना घरातच क्वारंटाईन करावे, संकटकाळी महिलांना मदत मिळावी याकरिता स्वतंत्र हेल्पलाईन नंबर उपलब्ध करावा, प्रत्येक विलगीकरण कक्षाबाहेर एक महिला व पुरुष, असे सुरक्षारक्षक नेमून तो परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत घ्यावा, अशी मागणी देखील मनसेतर्फे करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्तांनी सदर सूचनांची अवश्य अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी मनसे महिला उपाध्यक्षा अनिषा माजगावकर व महिला विभाग अध्यक्षा वैष्णवी सरफरेसह महिला विभाग सचिव श्वेता महाडीक, उपविभाग अध्यक्षा सुगंधा शिर्के, स्नेहा माळगावकर, शाखाध्यक्षा अंकिता राणे, श्रेया पारधी व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details