अहमदनगर- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या अध्यादेशानुसार लवकरात लवकर 20 टक्के व 40 टक्के अनुदान मिळावे. अघोषित शाळांना अनुदान मंजूर करावे, यासह विविध मागण्यांसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मुंबई मंत्रालय येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या दालनामध्ये आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे हे होते. यावेळी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, कायम विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयामधील सर्व प्रथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची 20 % व 40 % अनुदानाची फाईल लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन त्वरित अनुदान मंजूर करून वेतन सुरू करावे. तसेच, पुढील अनुदानाचा टप्पा हा प्रचलित नियमानुसार असावा. जेणेकरून शिक्षकांना पुढील टप्प्यासाठी वेठीस धरले जाणार नाही.