मुंबई -निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात आदिवासींच्या मदतीसाठी गिर्यारोहकांनी पुढाकार घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका सह्याद्रीच्या पट्ट्यात अनेक वस्त्या, आदिवासी पाड्यांना बसला आहे. या वस्त्यांच्या घरांवरील छप्परे उडाली आहेत. तर घरात अन्न धान्याचा कण नाही, अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ पुढे सरसावला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यातील वस्त्यांना आणि आदिवासी पाड्यांना गिर्यारोहक संघाच्यावतीने विविध मदत पूरवली जात आहे.
सह्याद्रीच्या कडे-कपारीतील कोणकोणत्या भागातील गाव, वस्त्या, आदिवासी पाड्यांचे नुकसान झाले याचे सर्वेक्षण करण्याचे कामही अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाकडून करण्यात येत आहे. या संदर्भातील अहवाल तयार करून तो राज्य सरकारपुढे सादर करण्यात येणार आहे, असे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले. मुळशीपासून तैलबैला, लोळावणा, राजमाची, भीमाशंकर, डाकोबा ते नाणेघाटापर्यंत हे वादळ पुढे सरकत गेले. या डोगरांमध्ये काटकऱ्यांची, आदिवासींची घरे आहेत. या वादळात त्यांचे फार नुकसान झाले आहे. त्यांना सध्या मदतीची गरज आहे. महासंघाच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्थां त्यांना थेट मदत करत आहेत. ज्यांना शक्य नाही त्यांच्याकडील मदत महासंघ गरजूपर्यंत पोहोचवत आहे.