गडचिरोली - सिरोंचा तालुक्यातील रुग्णाचा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे काल (सोमवारी) संध्याकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच या रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या रूग्णाच्या मृत्यूमुळे गडचिरोली जिल्ह्यात पहिला कोरोना बळी गेल्याची नोंद झाली आहे. मात्र, त्या व्यक्तीला जिल्ह्याबाहेर कोरोनाची लागण झाल्याची माहिती गडचिरोली आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोनामुळे मृत पावलेला रूग्ण हा सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथील मूळ रहिवासी आहे. त्याला 12 वर्षांपासून ह्रदयविकाराचा आजार होता. त्यावरील उपचारासाठी तो हैदराबाद येथील उस्मानिया रूग्णालयात उपचारासाठी जात होता. काही दिवसांपूर्वी तो चंद्रपूरला गेला होता. तेथून तो हैदराबादला गेला. तेथे 31 मे ला तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले. त्यानंतर उस्मानिया रूग्णालयाने त्याला कोरोनाचा रुग्ण असलेल्या हैदराबाद येथील महात्मा गांधी रग्णालयात रवाना केले. तेथेही तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची खात्री झाली. तेव्हापासून त्याच्यावर याचठिकाणी उपचार सुरू होते.