नवी दिल्ली - आयपीलएलच्या १२ व्या मौसमात कोणत्याही फ्रँचाईजीने मनोज तिवारीला खरेदी करण्यास स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे मनोज तिवारीने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. पण मनोजला पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. नुकतेच मनोजने दिल्ली संघाकडून सुरू असलेल्या इमरजेंसी ट्रायलमध्ये भाग घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागेवर नव्या खेळाडूला संधी देण्यासाठी दिल्लीने इमरजेंसी ट्रायलचे आयोजन केले होते. कोलकात्याकडून खेळणाऱ्या मनोज तिवारीने या ट्रायलमध्ये भाग घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज सोबत मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे, पंजाबचा मनप्रीत सिंह गोनी, कर्नाटकचा फिरकी गोलंदाज जगदीश सुचित हे सहभागी झाले आहेत.