वाळू माफियांना पोलिसांचा पुन्हा दणका, स्फोटकाच्या साह्याने उडवल्या ५ यांत्रिक बोटी - पुणे वाळू माफिया बातमी
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. यानुसार मिरवडी गावच्या हद्दीतील मुळा-मुठा नदीपात्रात काही व्यक्ती दोन फायबर बोट व तीन सक्शन बोटींच्या सहाय्याने पात्रातील वाळु बेकायदा उपसा करत होते.
दौंड (पुणे) - यवत पोलिसांनी दौंड तालुक्यातील मिरवडी गावच्या हद्दीत मुळा-मुठा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ३५ लाख रूपये किंमतीच्या ५ यांत्रिक बोटी स्फोटकांच्या साह्याने उडवल्या. अवैध वाळू उपसाप्रकरणी यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. यानुसार मिरवडी गावच्या हद्दीतील मुळा-मुठा नदीपात्रात काही व्यक्ती दोन फायबर बोट व तीन सक्शन बोटींच्या सहाय्याने पात्रातील वाळु बेकायदा उपसा करत होते.
या ठिकाणी पोलीस पथक गेल्यानंतर बोटीवरील वाळू काढणाऱ्या व्यक्ती बोटी जागीच सोडून पळून गेल्या. त्यातील एक व्यक्ती हा जागीच पोलिसांना मिळाला असून त्याचे नांव फारजुल सिंकदर शेख (वय 25, रा. हिंगणगाव ता. हवेली, जि. पुणे) असे आहे.
पकडलेल्या व्यक्तीने पोलीस पथकास बोट मालकांची दिली माहिती :
वाळू उपसा करण्याच्या बोटी या विशाल कोतवाल (रा.आष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे), सचिन थोरात (रा. हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे), सुभाष पवार (रा. हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे), अंकुश मल्लाव (रा. हिंगणगाव ता. हवेली, जि. पुणे), अविनाश टकले (रा. मिरवडी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या मालकीच्या आहेत, अशी माहिती पकडलेल्या व्यक्तीने पोलीस पथकास दिली.
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :
या गुन्ह्याबाबत पुंडलिक नामदेव केंद्रे, गावकामगार तलाठी (दहीटणे, मिरवडी ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. यवत पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.