सातारा : कोरोना काळात रुग्णांची होणारी हेळसांड, आरोग्य यंत्रणेचा बोजवारा, इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णांसाठी जादा सुविधा निर्माण करण्यात आलेले अपयश व एकूणच प्रशासनाचा चालढकल व वेळकाढूपणा, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आदीला कंटाळून कारभार न सुधारल्यास येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व सामाजिक संघटना, बिगर राजकीय संघटना आणि सर्व पक्षीय 'मूक मोर्चा' काढण्याचा इशारा सातारा पालिकेतील नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिला आहे.
कोविडबाबत प्रशासन निष्काळजी असल्याचा आरोप करत साताऱ्यात मूक मोर्चाची हाक
कोरोनाचे व्यवस्थापन नीट न केल्याचा आरोप ठेवत नगरसेवक अमोल मोहिते यांनी मूक मोर्चाचा इशारा दिला आहे. बाधितांची संख्या वाढत असताना जिल्हाप्रशासन नेमके काय करत होते, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की सातारा जिल्ह्यातील कोरोबाधितांची संख्या जवळपास ३१ हजारांच्या पुढे आहे. मृत्युंचा आकडा आता हजारांच्या समीप आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात ठेवून काम केले असते तर साताऱ्यावर ही वेळ आली नसती. बाधितांची संख्या वाढत असताना जिल्हाप्रशासन नेमके काय करत होते, त्याचा उलगडा होत नाही. सातारकर संयमी आहेत, म्हणून प्रशासन काहीच हालचाल करत नसेल तर सातारकरांना 'क्रांतिकारी बाणा' दाखवावा लागेल.
रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर हा लांबचा विषय आहे. जिल्ह्यात एकूण किती बेड आहेत आणि नवीन बाधितांना त्याची उपलब्धता कुठे होईल, याची एकही माहिती मिळत नाही. जिल्हात किती रेमिडेसिवर उपलब्ध आहेत आणि ती मिळविण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याचीही माहिती मिळत नाही. इंजेक्शन मिळविण्यासाठी बाधितांच्या नातेवाईकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. रेमिडेसिवर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा सामाजिक संस्था करत आहेत, असे मोहिते म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेवून कार्यपध्दती बदलावी. यावर सकारात्मक विचार न झाल्यास येत्या सोमवारी 'मूक मोचा' काढणार आहोत. आमच्यावर व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले तरी आमची हरकत नाही. सातारकरांसाठी एक पाऊल उचललेच आहे तर माघार घ्याचीच नाही. 'सातारी बाणा ' काय असतो, याची झलक स्वातंत्र्यलढ्यात इंग्रज सरकारने पाहिलेली आहे. त्याचा प्रत्यय येईल, असा इशाराही अमोल मोहिते यांनी दिला आहे.