नागपूर - नागपूरच्या माझी मेट्रो प्रोजेक्टमध्ये तब्बल ७८१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप जय जवान, जय किसान संघटनेने अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे. टेंडरच्या स्वीकृत किमतीनंतर सुधारित किमतीनुसार कोणतेही टेंडर प्रक्रिया न राबवता शेकडो कोटी रुपयांचे ठेके नियमबाह्य पद्धतीने वाट्ल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृह शहरातील मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असल्याचे प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.
प्रशांत पवार यांनी पत्रकारपरिषेला माहिती दिली नागपूर मेट्रो प्रोजेक्ट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्याची किंमत 8500 कोटी रुपये इतकी होती. पहिल्या टप्यातील बहुतांश कामे आटोपले असून दुसऱ्या टप्यातील ( विस्तारित ) कामाचा डीपीआर तयार झाला आहे. आणि केंद्राच्या मंजुरी करीता तो नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे. पहिल्या टप्यातील एलिव्हेटेड ट्रकचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो स्टेशन तयार करण्याकरीता निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी रिच-3 (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) मार्गावरील 10 मेट्रो स्टेशन बांधण्यासाठी महामेट्रोने निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्या कराराची किंमत 445.75 कोटी रुपये निर्धारित करण्यात आली. असे असताना आयटीडी नावाच्या कंपनीने तो टेंडर 237.88 कोटी रुपयात मिळवला.त्यानंतर मात्र सुधारित किमतीच्या नावावर 325 कोटी रुपयांचा वाढीव टेंडर कोणतीही निविदा न काढता मंजूर करण्यात आला. ज्यामध्ये 88 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे. याचप्रमाणे रिच -2 मार्गावरील स्टेशनच्या बांधकामांच्या टेंडरची स्वीकृत किमतीच्यानंतर सुधारित किमतीनुसार मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही प्रशांत पवार यांनी केला. एवढेच नाही तर झिरो माईल स्टेशनच्या किमतीत सुद्धा वाढ करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण गैरव्यवहाराची दाखल सीएनजी ने घेतली असल्याचा दावा त्यांनी केला असून या गैरव्यवहाराची तक्रार भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे दाखल करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.