पुणे - पुण्याहून मुंबईच्या दिशेने अवैध दारूची वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. मात्र जप्त केलेला कंटेनरच आरोपींनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पळवल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू तस्करांचा 'असाही' कारनामा, जप्त केलेला कंटेनरच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पळवला - पुणे अवैध दारू न्यूज
पुण्याहून मुबंईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून पकडला मात्र आरोपींनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यलयात येऊन कंटेनर पळविला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 सप्टेंबरला पुण्याहून मुंबईच्या दिशेने अवैध दारूची वाहतूक करणारा कंटेनर पकडला. सोमटने फाटा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी कारवाई करून कंटेनर ताब्यात घेत 50 लाखांची दारू जप्त केली होती. कारवाईनंतर दारुसह कंटेनर तळेगाव चाकण रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणण्यात आला. मात्र 1 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास आरोपी कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच झटापट करून 50 लाखांची अवैध दारू आणि 20 लाखांचा कंटेनरसह पोबारा केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.